Monday, August 16, 2010

Life is beutiful / La vita è bella(1997)

By Roberto Benegni
Italian film
कथेचा काळ दुस-या महायुद्धाच्या दरम्यानचा..
हा चित्रपट आहे एका ज्युईश ईटालियन तरुणाचा, गिडो(रौबर्टो बेनिग्नी) जो अरेझो शहरामध्ये
बुकस्टौल काढण्यासाठी आलेला असतो, सुरुवातीस भांडवल नसल्याने काकाच्या रेस्टौरंट मध्ये
वेटर चं काम करतो. याच दरम्यान त्याची ओळख होते ’डोरा’(निकोलेट ब्राश्ची) नावाच्या तरूण शिक्षिकेशी
तो बघताक्षणी तिच्या प्रेमात पडतो , नशिबाने पुन्हा पुन्हा त्यांच्या गाठीभेटी होतात आणि त्याचं प्रेम आणखी दृढ होतं, तो तिला तिच्या एंगेजमेंट मधून पळवून घेऊन जातो , चित्रपटाचा हा पहिला भाग विनोदी , हलकाफ़ुलका आणि रोमैन्टीक असा..


चित्रपटाच्या पुढच्या भागात गिडो आणि डोरा यांचं लग्न होऊन बरीच वर्षे झाली असतात त्यांना एक छोटासा मुलगा असतो जोशुआ नावाचा. बुक स्टौल काढण्यात गिडो ला यश आलं असतं. आणि त्यांचं जीवन असं सुरळीत चालू असतानाच जर्मनीच्या नाझी आक्रमणाच्या कचाट्यात हा देश सापडतो..गिडो ज्युईश असल्याने त्याच्या कुटुंबाला पकडून ’कौन्सनट्रेशन कैम्प’(छळ छावणी) मध्ये ठेवतात. आणि येथेच चित्रपटाचा खरा गाभा आहे, गिडो आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर जोशुआ यास हा छळ कैम्प म्हणजे एक स्पर्धा असल्याचे पटवून देतो आणि यातून बाहेर पडण्यासाठी पौईंट्स कमवायचे असं सांगतो , सर्वात जास्त पौइंट मिळणा-यास रणगाडा मिळणार असल्याचे आमिष ही दाखवतो
नाझी छावणीतील अतोनात छळ आणि त्याची किंचीत कल्पनाही आपल्या लहानग्यामुलास पोहचू नये या साठी त्याने केलेला अट्टाहास ..
इतक्या क्रुर परिस्थितीतही गिडोचा अगदी सहज विनोदी स्वभाव आणि जिद्दी वृत्ती आजुबाजुचं सारं काही जिंकुन घेते..


हा चित्रपट पहायलाच हवा ..

Sunday, August 15, 2010

Tuck Everlasting (2002)




टक एव्हरलास्टिंग
(२००२)
दिग्दर्शक:Jay Russell.

विनी. विनीफ़्रेड फ़ोस्टर.
उच्चभ्रू घराण्यातील मुलगी. वय वर्षे १५.
नियमांचा कंटाळा. शिष्टाचारांचा जाच. याची परिणती होते ती जंगलात पळून जाण्यात.
घटना घडत जातात. आणि तिची भेट होते एका अजब कुटुंबाशी.
त्यांचं नाव असतं टक. दोन भाऊ आणि त्यांचे आई-वडील.
या कुटुंबाला शाप असतो अमर्त्य असण्याचा.
तिच्याच मालकीच्या जंगलातील एका झर्‍याचं पाणी त्यांना अमर्त्य बनवतं.
कधीच न मरण्याची रम्य कल्पना प्रत्यक्षात आली तर ती मृत्यूपेक्षाही भयंकर ठरू शकते.
त्यांनी पिढ्यानपिढ्या नष्ट होताना पाहिलेल्या असतात. जग बदलताना त्याची स्थित्यंतरं पाह्यलेली असतात. स्वत:च्या मुला-नातवंडांना डोळ्यांसमोर श्वास टाकताना पाह्यलेलं असतं.
नजरा शेकडो वर्षांतही स्वजनांच्या मृत्यूला सरावत नाहीत.
हे कुटुंब असतं प्रवाहाच्या बाजूच्या दगडासारखं.
प्रवाह चालत राहतो. पण खडक तिथेच.

विनी दोघांपैकी लहान भावाच्या प्रेमात पडते. जेसी. वय वर्षे १७. कायम.
मध्यंतरी कुणीतरी त्या कुटुंबाच्या शोधात फ़िरत तिथे येतं.
अमरत्वाचं रहस्य जाणण्यासाठी.
त्याचं परिणामस्वरुप म्हणून कुटुंबाला ते जंगल सोडून दुसरी कडे जाणं भाग असतं.
जेसी तिला वचन देतो की तो परत येईल.
पण तिने त्या झर्‍याचं पाणी प्यावं. कायम त्याच्यासोबत राहण्यासाठी.
आता तिच्यासमोर निर्णय असतो तो निवडीचा.
अमरत्वाचा किंवा प्रत्येक क्षणाला जिवंत, ताजं असणारं पण मर्त्य जीवन निवडण्याचा.

वर्षं जातात. जेसी परत येतो.
तोवर आजूबाजूचं सारं बदललेलं असतं.
रस्ते. माणसं. जंगल जवळ जवळ नाहिसं झालेलं असतं.
तो शोधत शोधत झर्‍याच्या जागी येतो.
तिथे झरा नसतोच. पण तिथे असतं थडगं.सुरेख समाधी.

निळ्या डोळ्यांच्या परीने संपणार्‍या आयुष्याची निवड केलेली असते...

Do not fear death, but rather the unlived life. You don't have to live forever. You just have to live. 

Saturday, August 14, 2010

The Sea Inside(Mar Adentro)(2004)







 द सी इनसाईड
(२००४) स्पॅनिश.
दिग्दर्शक:  Alejandro Amenábar

रॅमोन सॅंपेद्रो. एक शिप मेकॅनिक. समुद्र हा जणू अस्तित्वाचा भाग.
किंबहुना त्याहून जास्त. अस्तित्वशोधाचा भाग.
पण एकदा समुद्रात बुडी घेत असताना झालेल्या अपघातात समुद्रच काय पण बिछान्याबाहेरचं जग स्पर्शाला पारखं होऊन जातं.
कायमस्वरुपी Quadriplegia.
आजार ही असा की मानेखालच्या प्रत्येक स्नायुची हालचाल कायमस्वरुपी बंद.
संपूर्ण आयुष्य बेभान होऊन जगणार्‍याला हे लुळेपण कधीच न पेलवणारं.
आयुष्य ग्रेसफ़ुली संपवण्याचा अट्टाहास.
पण कायद्याने इच्छामरणाला परवानगी नाही.
त्याच्या इच्छामरणासाठी ३० वर्षांच्या अविरत लढ्यावर काढलेला हा चित्रपट.
लढाही असा की तो निव्वळ कायदेशीर लढाई न राहता वेगळी कलाकृती बनून जावी.

चित्रपट निव्वळ लढा चित्रित करत नाही.
रॅमोन. त्याची आजारातही अबाधित राहिलेली तल्लख वैचारिकता.
त्याचे वेगवेगळ्या विचारांचे पण त्याच्यावरच्या प्रेमाने बांधलेले त्याचे कुटंबिय.
त्याच्या आयुष्यातल्या स्त्रिया.
आईप्रमाणे देखभाल करणारी आणि तरीही त्याच्या निर्णयाबाबत पाठीशी राहणारी वहिनी.
मूड डिसऑर्डर आणि स्मृतीभ्रंशाचा विकार सोबत घेऊन त्याचा उद्देश समजणारी त्याची वकील, जुलिया.
त्याचं आयुष्य सद्यस्थितीतही किती मोलाचं आहे त्याला समजावून देण्यासाठी आलेली स्थानिक, रोसा, जी त्याचा हेतू आणि विचार समजल्यावर पूर्णत: बदलून जाते.
त्याचा निर्णय अजिबात मान्य नसणारा मोठा भाऊ.
मुलाचा मरणासाठीचा शांत आग्रह समजावून घेण्याचा प्रयत्न करणारे त्याचे वडील.
त्याचं मतपरिवर्तन करण्यासाठी येणारे आणि त्याच्या प्रश्नांमुळे निरुत्तर होऊन परतणारे धर्मगुरु.

आणि जगणं वर्षांमध्ये नाही तर क्षणांमध्ये उमजतं.
तेवढंच नाही तर मरण जगणं थांबवत नाही हे सार्‍यांना पटवून देण्याचा प्रयत्न करणारा रॅमोन.
स्वत: मृत्यूसाठी आग्रही असणारा तो निरनिराळ्या प्रकारे प्रत्येकाला त्याच्या जगण्याच्या दिशा दाखवत राहतो. प्रेमातून,हट्टातून,मरणातून.

कोर्टातून त्याची इच्छामरणाची विनंती वारंवार नाकारली जाते.
३० वर्षं सार्‍यांचा प्रवास त्याच्या मरणाच्या दिशेने चालू राहतो.
त्याच्याच इच्छेखातर.
स्वेच्छेने किंवा अनिच्छेने.
३० वर्षे अविरत प्रयत्न करुनही परवानगी नाकारल्यानंतर रॅमोन त्याच्या कुटुंबियांच्या मदतीने सायनाईड घेऊन हा प्रवास संपवतो.
एक फ़ार काळ लांबलेला देखणा सूर थांबल्याचा अनुभव येतो.

Javier Bardem चा नितांत सुंदर अभिनय.
पण आणखीही बर्‍याच गोष्टींसाठी चित्रपट मनात कायमचा नोंदवला जातो.

Once (2006)

How often do you find a right person ?

ही कथा आहे एका तिशीतल्या आयरीश गीतकार/गायकाची (ग्लेन हैनसर्ड) जो दिवसा vacuum cleanres दुरुस्त करण्याच्या दुकानात वडिलांना मदत करून आणि संध्याकाळी रस्त्यांवर गिटार वाजवून स्वत:ची गाणी गाऊन पैसे कमावतो. एक झेक मुलगी (मार्केटा इर्ग्लोव्हा) क्लिनिंग कंपनी मध्ये काम करते घरची बेताची परिस्थिती असताना संगीताच्या आवडीने एका पियानोच्या दुकानात लंच ब्रेक मध्ये पियानो वाजवण्याची प्रैक्टीस करते.दोघांची योगायोगाने भेट होते एकमेकांशी मैत्री होते. ती त्याला त्याच्या गाण्यांची एक डेमो CD रेकौर्ड करायला मदत करते जेणे करून तो लंडन मध्ये एखाद्या म्युझिक कंपनीचं कौन्ट्रैक्ट मिळवू शकेल.
आणि याच दरम्यान दोघे आपआपल्या प्रेमभंगातून सावरतात आणि त्यांना त्यांच्या गाण्यातून एकमेकांबद्दलचं प्रेम जाणवू लागतं
जसा जसा चित्रपट पुढे सरकू लागतो हे जाणवू लागतं ह्या चित्रपटाची ताकद किंवा हा चित्रपटाचा उद्देश कथा नसून त्याचं संगीत आहे. प्रत्येक गाण्यातून ओतप्रोत प्रेम वाहतं. या चित्रपटाचं संगीत पाहणा-याला चित्रपटाच्या प्रेमात पाडतं.
खरंतर ग्लेन आणि मार्केटा हे मुळत: ऐक्टर्स नसून गायक/गीतकार/संगीतकार आहेत आणि या चित्रपटाचं संगीत आणि गाणी ही त्यांचीच आहेत.

Falling slowly” या गाण्याला Best original Song” चं औस्कर पारितोषिक मिळालं आहे.
हा चित्रपट पहायलाच हवा..

Friday, August 13, 2010

RockStar (2001)



By Stephen Harek


" The story of a wanna be who got to be "  
"स्टील ड्रैगन " या रौक बैण्ड च्या संगीताने पछाडलेला "क्रिस"(मार्क व्हालबर्ग) मित्रांच्या साथीने एक tribute band स्थापन करतो जो फ़क्त स्टील ड्रैगन ची गाणी सादर करेल. परंतू हळू हळू त्याचे मित्र यास नकार देऊ लागतात कुणाची उसनी गाणी गाऊन तकलादू प्रसिद्धी मिळवून काय उपयोग असा त्यांचा निर्णय होऊ लागतो तर एकीकडे पुर्णपणे डेडीकेटेड असा क्रिस...
या वादातून क्रिस ग्रुप सोडून निघून जातो आणि त्याच्याबरोबर त्या ग्रुप ची एजंट , क्रिस ची लहानपणीची मैत्रीण एमिली( जेनिफ़र ऐनिस्टन) सुद्धा त्या ग्रुप चं एजंट पद सोडते


आणि अशाच प्रकारच्या एका वादात SD च्या लीड सिंगर ची SD मधून हकालपट्टी होते आणि नशिब बलवत्तर असलेल्या क्रिस ला SD चा लीड सिंगर बनण्याची संधी चालून येते. पुढे क्रिस जगतो "रौकस्टार इझी" ची स्वप्नवत लाईफ़.


" Every Boy wants to be you & every girl wants to be with you "


पण त्या स्वप्नवत जगात प्रसिद्धी बरोबर त्याचा सामना वेगवेगळ्या टेंम्पटेशन्सशी होतो त्यात त्याचं बरच काही हरवायला लागतं अगदी एमिली सुद्धा ..


याच नंतर "ईझी" ला स्वत:तला खरा क्रिस गवसतो ..


चित्रपटातील मेटल रौक म्युझिक आणि चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना याला दाद द्यायलाच हवी .
जर तुम्हाला कर्णकर्कश्य संगीताची आवड नसेल तरीही तुम्हाला क्रिस चं शेवटचं गाणं नक्की आवडेल..

Random Hearts (1999)





कोणता चित्रपट पहावा यावर काहीच सुचत नव्हतं,  कोणतातरी random चित्रपट पहावा म्हणून तेच नाव सर्च बौक्स मध्ये टाकलं आणि हाती लागला सिडने पोलौक चा Random Hearts.
" कोणतेही पुर्वग्रह नसले की एखाद्या गोष्टीबद्दल होणारं मत आपलं स्वत:च असतं "

लौस एंजेलिस च्या पोलिस विभागात सार्जंट पदावर असणारा "डच" (हैरिसन फ़ोर्ड) आणि सिनेटर च्या निवडणूकीस उभी असलेली "के" (क्रिस्टीन स्कौट थौमस)यांच्या भोवती फ़िरणारा हा चित्रपट. या दोघांना नायक नायिका म्हणावं तर त्यांचा एकमेकांशी ओळखीइतकाही संबंध नसतो परंतू एका अनपेक्षित घटनेने त्यांची आयुष्य एकमेकात गुंतत जातात. ’डच’ त्या गुंत्याच्या शेवटापर्यंत जायचा प्रयत्न करतो तर ’के’ त्या गुंत्यापासून दूर पळण्याचा ..


मायामी ला जाणा-या एका विमानाचा अनपेक्षित अपघात , अपघातात मृत्यूमुखी पडलेले डच ची पत्नी आणि के चा पती , डच च्या पत्नी चं पैसेंजर लिस्ट मध्ये नाव नसणं.. आणि सुरु होतो एका रहस्याचा शोध          
(याला ग्लैमरस रहस्यमयपट न बनवता तिथेच रहस्याचा उलगडा करून चित्रपट ट्रैक वर ठेवण्यात दिग्दर्शकाचं यश म्हणावं लागेल ) या रहस्यापेक्षाही या चित्रपटात पुढे तो जे व्यक्त करतो ते फ़ार वेगळं आहे.
शोधात समजलेले डच च्या पत्नी चे के च्या पतीशी असलेले संबंध आणि दोघांनाही याचा साधा मागमुसही नसणे, शोधात उलगडत जाणारे दोघांचे भविष्यातील प्लान्स, डच आणि के दोघांना आश्चर्यचकीत करतात तसेच यामुळे निर्माण होणारा राग, आपआपल्या स्थिर जीवनात होऊ शकणारी उलथापालथ यामुळे निर्माण झालेली भीती आणि समदु:खी असल्याने एकमेकांबद्दल निर्माण झालेलं प्रेम असं एक वेगळंच भावनांच ’कौकटेल’ Random Hearts मधून अनुभवायला मिळतं
हा चित्रपट ’पहायला हवा’

Half Nelson(2006)






हाफ़ नेल्सन
(२००६)
दिग्दर्शक: Ryan Fleck

स्वत:ला न समजू शकणारी दोन माणसं कधीतरी एकमेकांना समजून जातात.
किंवा स्वतःच्या अपूर्ण असण्याचं ओझं न पेलवता येणारी दोन माणसं एकमेकांच्या अस्तित्वाला पूरक ठरू शकतात.
हाफ़ नेल्सन उलगडत जातो तो दोन पूर्णपणे वेगळ्या वातावरणातून आलेल्या पूर्णतः भिन्न माणसांच्या विचित्र नात्याच्या गुंत्यातून.
डॅन एका शाळेत इतिहास शिकवतो.
इतिहास. बदलांचा अभ्यास.
ऎतिहासिक आणि वैयक्तिक पातळीवरही.
त्याच वेळी वैयक्तिक आयुष्यातले विरोधाभास न पचवता येण्यामुळे आलेलं वैफ़ल्य घेऊन जातं ड्र्गजकडे.
ठरवलं तर दुसर्‍याच्या वैफ़ल्याची कारणं कशीही शोधता येतात.
खासकरुन थोड्या अंतरावरुन पाहताना ते जास्त सोपं जातं.
पण इथे पाहणार्‍याला न्यायनिवाडा करायची मुभा नाही.
चित्रपट पहिल्या सेकंदापासूनच तुम्हांला कीवच करायची असेल तर तुम्ही चुकीच्या जागी आला आहात ची अदृश्य पाटी दाखवत राहतो.

डॅन आपल्या कुटुंबासोबत राहत नाही.
ज्या काही occasional भेटी दाखवल्या आहेत त्यातून डॅनच्या अंतर्मुख असण्याची कारणं धूसरपणे जाणवतात.
आपल्याच समजांमध्ये मश्गुल असणारे वडील त्याच्या कुटुंबाविषयीच्या नावडीचं प्रतीक म्हणून दिसतात.

याउलट त्याची सारी आस्था,संयत वागणं दिसतं ते त्याच्या वर्गात.
त्याच्या मुलांमध्ये.
तो आपली भूमिका (असलीच तर) स्पष्ट करताना दिसतो की मुलं त्याला focused राह्यला मदत करतात.
त्यातही एक खास मूल.
त्याची निग्रो विद्यार्थिनी. ड्रे.
तिच्या समस्या निराळ्या.
ड्रे चे आईवडिल एकत्र राहत नाहीत.
आई हॉस्पिटलमध्ये सतत कामावर.
तिचा भाऊ ड्रगविक्रीच्या आरोपाखाली तुरुंगात आहे.
तीही त्याच वाटेवर चालू लागण्याची शक्यता डॅनला तिच्याकडे जास्त लक्ष द्यायला भाग पडते.
तिलाही त्याच्या ड्रगजविषयीच्या सवयींबद्दल कळतं.
त्याच्याविषयी थोडीशी करुणा..थोडीशी आपुलकी तिला त्याच्याकडे वळवतात.


दोन वेगवेगळ्या कारणांनी एकाकी माणसं एकमेकांना एकटं होण्यापासून वाचवण्याच्या शक्यतांवर येऊन ठेपलेली असतानाच चित्रपट संपतो...