Friday, August 13, 2010

Half Nelson(2006)






हाफ़ नेल्सन
(२००६)
दिग्दर्शक: Ryan Fleck

स्वत:ला न समजू शकणारी दोन माणसं कधीतरी एकमेकांना समजून जातात.
किंवा स्वतःच्या अपूर्ण असण्याचं ओझं न पेलवता येणारी दोन माणसं एकमेकांच्या अस्तित्वाला पूरक ठरू शकतात.
हाफ़ नेल्सन उलगडत जातो तो दोन पूर्णपणे वेगळ्या वातावरणातून आलेल्या पूर्णतः भिन्न माणसांच्या विचित्र नात्याच्या गुंत्यातून.
डॅन एका शाळेत इतिहास शिकवतो.
इतिहास. बदलांचा अभ्यास.
ऎतिहासिक आणि वैयक्तिक पातळीवरही.
त्याच वेळी वैयक्तिक आयुष्यातले विरोधाभास न पचवता येण्यामुळे आलेलं वैफ़ल्य घेऊन जातं ड्र्गजकडे.
ठरवलं तर दुसर्‍याच्या वैफ़ल्याची कारणं कशीही शोधता येतात.
खासकरुन थोड्या अंतरावरुन पाहताना ते जास्त सोपं जातं.
पण इथे पाहणार्‍याला न्यायनिवाडा करायची मुभा नाही.
चित्रपट पहिल्या सेकंदापासूनच तुम्हांला कीवच करायची असेल तर तुम्ही चुकीच्या जागी आला आहात ची अदृश्य पाटी दाखवत राहतो.

डॅन आपल्या कुटुंबासोबत राहत नाही.
ज्या काही occasional भेटी दाखवल्या आहेत त्यातून डॅनच्या अंतर्मुख असण्याची कारणं धूसरपणे जाणवतात.
आपल्याच समजांमध्ये मश्गुल असणारे वडील त्याच्या कुटुंबाविषयीच्या नावडीचं प्रतीक म्हणून दिसतात.

याउलट त्याची सारी आस्था,संयत वागणं दिसतं ते त्याच्या वर्गात.
त्याच्या मुलांमध्ये.
तो आपली भूमिका (असलीच तर) स्पष्ट करताना दिसतो की मुलं त्याला focused राह्यला मदत करतात.
त्यातही एक खास मूल.
त्याची निग्रो विद्यार्थिनी. ड्रे.
तिच्या समस्या निराळ्या.
ड्रे चे आईवडिल एकत्र राहत नाहीत.
आई हॉस्पिटलमध्ये सतत कामावर.
तिचा भाऊ ड्रगविक्रीच्या आरोपाखाली तुरुंगात आहे.
तीही त्याच वाटेवर चालू लागण्याची शक्यता डॅनला तिच्याकडे जास्त लक्ष द्यायला भाग पडते.
तिलाही त्याच्या ड्रगजविषयीच्या सवयींबद्दल कळतं.
त्याच्याविषयी थोडीशी करुणा..थोडीशी आपुलकी तिला त्याच्याकडे वळवतात.


दोन वेगवेगळ्या कारणांनी एकाकी माणसं एकमेकांना एकटं होण्यापासून वाचवण्याच्या शक्यतांवर येऊन ठेपलेली असतानाच चित्रपट संपतो...

1 comment:

  1. Bahut acche, nice interpretation and good usage of words, everyone can relate to, take it up professionally ! Neil.

    ReplyDelete