Saturday, August 14, 2010

The Sea Inside(Mar Adentro)(2004)







 द सी इनसाईड
(२००४) स्पॅनिश.
दिग्दर्शक:  Alejandro Amenábar

रॅमोन सॅंपेद्रो. एक शिप मेकॅनिक. समुद्र हा जणू अस्तित्वाचा भाग.
किंबहुना त्याहून जास्त. अस्तित्वशोधाचा भाग.
पण एकदा समुद्रात बुडी घेत असताना झालेल्या अपघातात समुद्रच काय पण बिछान्याबाहेरचं जग स्पर्शाला पारखं होऊन जातं.
कायमस्वरुपी Quadriplegia.
आजार ही असा की मानेखालच्या प्रत्येक स्नायुची हालचाल कायमस्वरुपी बंद.
संपूर्ण आयुष्य बेभान होऊन जगणार्‍याला हे लुळेपण कधीच न पेलवणारं.
आयुष्य ग्रेसफ़ुली संपवण्याचा अट्टाहास.
पण कायद्याने इच्छामरणाला परवानगी नाही.
त्याच्या इच्छामरणासाठी ३० वर्षांच्या अविरत लढ्यावर काढलेला हा चित्रपट.
लढाही असा की तो निव्वळ कायदेशीर लढाई न राहता वेगळी कलाकृती बनून जावी.

चित्रपट निव्वळ लढा चित्रित करत नाही.
रॅमोन. त्याची आजारातही अबाधित राहिलेली तल्लख वैचारिकता.
त्याचे वेगवेगळ्या विचारांचे पण त्याच्यावरच्या प्रेमाने बांधलेले त्याचे कुटंबिय.
त्याच्या आयुष्यातल्या स्त्रिया.
आईप्रमाणे देखभाल करणारी आणि तरीही त्याच्या निर्णयाबाबत पाठीशी राहणारी वहिनी.
मूड डिसऑर्डर आणि स्मृतीभ्रंशाचा विकार सोबत घेऊन त्याचा उद्देश समजणारी त्याची वकील, जुलिया.
त्याचं आयुष्य सद्यस्थितीतही किती मोलाचं आहे त्याला समजावून देण्यासाठी आलेली स्थानिक, रोसा, जी त्याचा हेतू आणि विचार समजल्यावर पूर्णत: बदलून जाते.
त्याचा निर्णय अजिबात मान्य नसणारा मोठा भाऊ.
मुलाचा मरणासाठीचा शांत आग्रह समजावून घेण्याचा प्रयत्न करणारे त्याचे वडील.
त्याचं मतपरिवर्तन करण्यासाठी येणारे आणि त्याच्या प्रश्नांमुळे निरुत्तर होऊन परतणारे धर्मगुरु.

आणि जगणं वर्षांमध्ये नाही तर क्षणांमध्ये उमजतं.
तेवढंच नाही तर मरण जगणं थांबवत नाही हे सार्‍यांना पटवून देण्याचा प्रयत्न करणारा रॅमोन.
स्वत: मृत्यूसाठी आग्रही असणारा तो निरनिराळ्या प्रकारे प्रत्येकाला त्याच्या जगण्याच्या दिशा दाखवत राहतो. प्रेमातून,हट्टातून,मरणातून.

कोर्टातून त्याची इच्छामरणाची विनंती वारंवार नाकारली जाते.
३० वर्षं सार्‍यांचा प्रवास त्याच्या मरणाच्या दिशेने चालू राहतो.
त्याच्याच इच्छेखातर.
स्वेच्छेने किंवा अनिच्छेने.
३० वर्षे अविरत प्रयत्न करुनही परवानगी नाकारल्यानंतर रॅमोन त्याच्या कुटुंबियांच्या मदतीने सायनाईड घेऊन हा प्रवास संपवतो.
एक फ़ार काळ लांबलेला देखणा सूर थांबल्याचा अनुभव येतो.

Javier Bardem चा नितांत सुंदर अभिनय.
पण आणखीही बर्‍याच गोष्टींसाठी चित्रपट मनात कायमचा नोंदवला जातो.

No comments:

Post a Comment